चंद्रपूर (प्रतिनिधी) – राज्यातील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानरकर यांचं रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झालं आहे. खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे.
बाळू धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत होते. ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार होते. मागील तीन दिवसांपासून ते दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यापूर्वी त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना एअर एम्ब्युलन्सने दिल्ली येथे हलवण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी १ वाजता निवासस्थानी आणण्यात येणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेसचा पराभव झालेला असताना बाळू धानोरकर यांनी विजयश्री खेचून आणत राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार बनले होते.त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.