जळगाव ( प्रतिनिधी ) – आठ वर्षांच्या मतिमंद बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि दंडाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे .
धरणगाव तालुक्यातील एका गावात 8 वर्षीय मतिमंद बालिका कुटुंबीयांसह राहते . 24 नोव्हेंबर 2020 सकाळी 10.30 ते 11.30 वाजेच्या सुमारास बालिका घरी असताना गावातील आरोपी रमेश मंगा कळस्कर याने मुलीला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस ठाण्यात रमेश मंगा कळस्कर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा खटला जळगाव सत्र न्यायालयाचे न्या डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला सरकारी वकील निलेश चौधरी यांनी युक्तिवाद केला. 9 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत, पीडितेचे वडील, पंच, तपासी अंमलदार आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. पीडित बालिका मतिमंद असल्याने या खटल्यात तिची साक्ष नोंदण्यासाठी गुजराती मूकबधीर विद्यालयाचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भाषाद्वारे, इशारे आणि खाणाखुणाच्या आधारे नोंदविण्यात आली. घटनेच्या दिवशी पिडीत बालिका घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडताना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे अत्याचार करणारा रमेश मंगा कळस्कर याला दोषी ठरविण्यात आले.
बुधवारी न्या खडसे यांच्या न्यायालयात कामकाज झाले त्यांनी आरोपी रमेश कळस्कर याला विविध कलमान्वये नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि 6 हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे सरकारी वकील निलेश चौधरी यांनी प्रभावी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी देविदास काळी व केस वॉच विलास पाटील यांनी सहकार्य केले.