नवी दिल्ली (वृत्तसंथा) – पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 15 जूनला चीनसोबत झालेल्या हिंस्र झडपेनंतर भारतीय नौदलाने चीनला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. भारतीय नौदलाने थेट दक्षिण चिनी समुद्रात आपली युद्धनौका तैनात केली आहे. त्यामुळे चीनवर भारताची जरब बसणार आहे. या तैनातीनंतर चीनकडून उच्चस्तरीय बैठकीत यावर आक्षेपही घेण्यात आला. चीनने या भागात 2009 नंतर कृत्रिम बेटं आणि सैन्यबळावर बराच विस्तार करण्याचा प्रयत्न केलाय. त्यात आता भारताने युद्धनौकांची तैनाती केल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत.
सरकारी सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘गलवान खोऱ्यात हिंस्र झटापट होऊन भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने दक्षिण चीन महासागरात आपली भव्य युद्धनौका तैनात केली आहे. या भागाला चीन आपलं क्षेत्र असल्याचा दावा करतो आणि इतर कोणत्याही देशाच्या सैन्याच्या उपस्थितीला विरोध करतो.’
भारतीय युद्धनौका अमेरिकेच्या युद्धनौकांच्या संपर्कात
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दक्षिण चीन महासागरात भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या तैनातीनंतर चीनवर जो परिणाम होणं अपेक्षित होतं तो झाला आहे. चीनने भारतासोबतच्या उच्चस्तरीय चर्चेदरम्यान भारताच्या युद्धनौकेविषयी तक्रार केली आहे. दक्षिण चीन सागरात तैनाती होत असताना भारतीय युद्धनौका अमेरिकेच्या युद्धनौकांशी संपर्कात होत्या.’
ही संपूर्ण मोहिम अत्यंत गोपनीयरित्या करण्यात आली. दरम्यान भारतीय नौदलाने अंदमान निकोबार बेटाजवळ मलक्का स्ट्रेटवर देखील जहाजाची तैनाती केली आहे. यामुळे चीनच्या नौदलावर लक्ष ठेवणं अधिक सोपं होणार आहे. या मार्गाने चीनचं नौदल हिंद महासागरात प्रवेश करतं. याशिवाय चीनची तेल वाहतूक आणि अन्य बेटांवरील वस्तूंचं दळणवळण देखील याच मार्गाने होते. भारत या क्षेत्रात तयार होणाऱ्या प्रत्येक स्थितीला तोंड देण्यास तयार असल्याचंही सुरक्षा दलाने स्पष्ट केलं आहे.
भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजांवर मानवरहित सिस्टम आणि सेन्सॉरचा वापर करुन रणनिती बनवण्याचंही काम सुरु आहे. यामुळे हिंद महासागरात येण्यासाठी मलक्का स्ट्रेटवर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाने आपल्या मिग 29 युद्ध विमानांना वायु दलाच्या एका विशेष तळावर सज्ज ठेवलं आहे. तेथे या विमानांचा युद्ध सराव सुरु आहे.