जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरीच्या उद्देशाने शहरात फिरत असलेल्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कार व चोरीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचार्यांचे पथक पेट्रोलिंग करीत असतांना अरविंद वाघोदे (वय २५,रा.सुप्रीम कॉलनी) व अनिल चौधरी (वय ४०,रा.अयोध्या नगर) हे दोघ संशयित संशयास्पदरित्या दिसले. पथकाने त्यांना थांबविले असता त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना अटक करीत त्यांची चौकशी केली त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून घरफोडीसाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेले दोघंही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्यावर आतापर्यंत सुमारे १० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अनिल चौधरीचा मुक्ताईनगरात झालेल्या घरफोडीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.