चाळीसगांव (विशेष प्रतिनिधी) – चाळीसगांव तालुक्यातील पिंपरखेडतांडा शिवारातील शेतात असलेल्या विदयुत पोलला जॉईन्ट असलेल्या तारेला स्पर्श करताच काका आणि नातू चिटकल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या अन्य चार जणांनीही त्यांना स्पर्श केल्याने एकुण सहाजण एकमेकांना चिटकले मात्र याचवेळी आरडाओरड ऐकताच मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने प्रसंगावधान राखत लाकडी बांबूने वीज वाहीनीवर प्रहार केल्याने खंडीत झालेल्या वीज प्रवाहात सहा जण वीजेच्या स्पर्शपासून अलीप्त झाले. दरम्यान यावेळी एकाचा मृत्यू झाला तर दोघांना गंभीर अवस्थेत डॉ. देवरे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ हलवण्यात आले तर अन्य दोघे देखील जखमी झाले असून परिसरात घटनेबाबत खळबळ उडाली आहे.
पिंपरखेड शिवारातील शेतात मोतिलाल परशुराम राठोड (वय-70) आणि त्यांचा नातू सोनू राठोड (वय-15) या दोघांचा विदयुत पोलला जोडून असलेल्या तारेला स्पर्श झाल्यानंतर या तारेत वीज प्रवाह उतरलेला असल्याने हे दोघे एका मागे एक तारेला चिटकले हे पाहताच त्यांना वाचवण्यासाठी शेजारील शेतातच असलेले त्यांचे अन्य नातेवाईक यांनी आरडा ओरड करीत त्यांना वाचवतांना स्पर्श झाल्याने ते देखील चिटकले असे एकूण सहा जण एकमेकांना चिटकल्याचे पाहताच त्यांचाच एक नातेवाईक किरण मिलींद राठोड याने लाकडी बांबूने प्रहार करुन वीज प्रवाह खंडीत केला. चिटकलेले सहाही जण वीजप्रवाह असलेल्या तारेपासून अलीप्त झालेत. मात्र तोपर्यंत गोकूळ शिवाजी राठोड याचा मृत्यू झाला, त्यातील दोघे गंभीररित्या भाजले होते. त्यांना तात्काळ चाळीसगांवी उपचारार्थ दाखल करण्यात आले तर अन्य दोघेही किरकोळ भाजले आहेत. पिंपरखेड शिवारातील या घटनेने परीसरात थरकाप उडाला होता. किरण राठोड याने वीजप्रवाह प्रसंगावधान राखुन खंडीत केला म्हणून अन्य जणांचा जीव वाचवता आला असला तरी गोकूळ राठोड या तरुणाचा या घटनेत झालेला मृत्यू राठोड कुटूंबियांना दु:खाचा डोंगर ठरला आहे. मयत गोकूळच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. स्व. वाडीलालभाऊ राठोड यांचा तो पुतण्या तर जिल्हापरिषदेचे माजी सदस्य राजेंद्र राठोड यांचा तो सख्खा चुलतभाऊ होता.