जळगाव (विशेष प्रतिनिधी) – २३ मार्च २०२० पासुन जळगाव जिल्हाच नव्हे तर संपुर्ण जग हे कोरोनाच्या प्रादुरभावामुळे लॉकडाऊनच्या विळख्यात सापडले आहे.गेल्या ७ महिन्यापासुन संपुर्ण जग हे शारिरीक मानसिक व आर्थिक दृष्ट्या लाचार व शक्तीहिन झाले आहे.खेळाडू योध्दापण कोरोनामुळे अशक्त ठरत असल्याचे कराटे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी सांगितले.
पुढे श्री. जंजाळे म्हणाले की, बरेच शारीरिक श्रम वाढविणारे खेळ व मनोरंजणाचे बंदिस्त व मैदानी खेळांचे प्रशिक्षण वर्ग हे बंद पडलेले आहेत. आपणास केवळ घरी बसलेली मुले दिसतील परंतू या लॉकडॉउनमुळे असे प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक ज्यांचे घर हे त्यांच्या प्रशिक्षण वर्गामुळे चालत असते हे देखिल घरी बसुन आहेत याचे दुष्परिणाम खेळ,खेळाडू आणि महत्वाचे म्हणजे मानवाची सुध्दृढता ही नष्ट होण्यावर आलेली आहे.
लॉकडॉउनमुळे निसर्गातील हवा पाणी हे शुध्द झालेत बरोबर आहे,परंतू मानवाचे मन व शरीर मात्र दूषित व दुर्बल होत चालले आहे. नैराश्यामुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाने मरणाऱ्यांची संख्या आपण रोजच मोजत आहोत, पहात आहोत परंतु या लॉकडाऊनमुळे खचलेल्या यूवा पिढी सोबत बाल गट ज्यांना पुर्वी पालक खेळायला बाहेर जा, मोबाईल हातात घेऊ नकोस, असे सारखे बजावत होते. तेच खेळाडू आता खचुन मोबाईलवर गेम खेळण्यासोबत अभ्यास करता आहेत. हे आपण हल्ली ऐकतोय, मोबाईलच्या दुष्परिणामांबद्दल आपण जाणतोच परंतू तरी देखिल मुलांना मोबाईल शिक्षणाच्या आहारी आपण सोडत आहोत, भविष्यात खेळ तर सुरू होतील परंतु खेळाडू व खेळीमेळीचे वातावरण मात्र नष्ट होईल बरेच खेळ व व्यायम प्रकार हे जोडीने अथवा सांघिक होतात हे आपण जाणतो पण सामाजिक अंतर ठेऊन आपण हे खेळ कसे खेळणार हा देखिल एक मोठा प्रश्न आहे. शिक्षक खेळाडूला किंवा विद्यार्थाला न रागवता, जवळ न घेता, त्याला शाबासकीची थाप न देता, अभिनंदनासाठी हातात हात न घेता, कस प्रेरणा देणार हा ही एक प्रश्न आहे.
पण कालपर्यंत जो विद्यार्थी-खेळाडू शिक्षकांच्या नजरेला घाबरुन अभ्यास करत होता,आपल्या चुका दुरूस्त करून यश संपादन करत होता तो लॉकडाऊन नंतर आता त्याला कष्टाविणा मोबाईलच्या माध्यमातुन घरात ज्ञान मिळवत आहे.विद्यार्थी व खेळाडू यांच्या मते मेहनती शिवाय किंवा कमी कष्ट करुन हे ज्ञान मिळवता येते,अशी मुलांची मानसिकता झालेली आहे.अभ्यास खेळ हे त्यांच्या मते सध्या तरी सोपे झाले आहेत,यामुळे भविष्यातील येणारे अडथळे मुलांना सोपे वाटतील पण प्रत्यक्षात सामोरे जाणे कठिण राहिल, ते ज्ञान मिळविण्यासाठी तेवढीच धडपड हे डिजिटल विद्यार्थी अथवा खेळाडू करतील का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे कारण या प्रश्नावर आपले पुढच्या पिढीचे अस्तित्व अवलंबुन आहे.
कोरोनाचा पराभव कसा होईल केव्हा होईल हि चिंता प्रत्येकाला सतावत आहे.पण क्रीडा क्षेत्र हा आपल्या जगाचा मुख्य कणा आहे हे देखिल तितकेच सत्य म्हणावे लागेल.कारण आज लहान मुले हे मैदानाला विसरुन मोबाईलच्या सानिध्यात शिक्षण घेत आहेत.प्रत्येकाला महित आहे, की या मुळे आपले खेळाडू व भविष्यातील सशक्त पिढी ही मानसिक व शारिरीक दृष्ट्या कमकुवत पोकळ व अशक्त होत चालली आहे.जोवर ‘ खेळाडूशी खेळाची नाळ पुन्हा’ जोडली जणार नाही तोवर आपला खेळाडू हा कोरोनाच्या या चक्रव्युहाला तोडू शकणार नाही. जर खेळाडू मैदानावर आला तर तो शारीरिक दृष्ट्या कणखर होईल. रोग प्रतिकारशक्ती ही गोळ्या औषधीने तर वाढेलच आपले डॉक्टर हे काम योग्यरित्या करतच आले आहेत आणि करतीलही यात तिळ मात्र शंका नाही.
मैदाने, व्यायाम शाळा,मनोरंजनाचे प्रशिक्षण वर्ग हे सुरू करावेच लागेल तरच उत्तम व निरोगी मानवता संपुष्टात येईल.क्रीडा क्षेत्र हे प्रगती साधण्याचे फार मोठे माध्यम आहे.म्हणुन क्रीडा क्षेत्र खुले होणे हे सध्या तरी गरजेचे आहे.सर्वांनी शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे.
माझ्या या मताशी किती लोक सहमत असतील मला ठाऊक नाही परंतु क्रीडा प्रेमी ,क्रीडा शिक्षक,खेळाडू हे नक्की प्रेरित होतील हे मात्र निश्चित असल्याचे क्रीडा शिक्षक व कराटे प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे यांनी आपले मत व्यक्त केले.