दिनांक 14/6/2020 रोजी सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचे प्रसारमाध्यमांनी जाहीर केले आणि अख्या बॉलिवूडवर शोककळा पसरली. कारण इरफान खान, आणि ऋषी कपूर यांच्या निधनाचे दुःख ताजेच होते. मुंबई पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून सुशांतच्या मृत्यूची नोंद केली. आणि काही वेळातच सुशांतच्या चिंतेच्या अग्नीच्या ज्वाला थंड होण्याच्या आताच सर्वात प्रथम बॉलिवूडची राणी आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत हिने भाष्य केले की सुशांतचा मृत्यू फिल्म इंडस्ट्रीच्या काही घराणे शाहीचा वारसा चालवणार्या लोकांनी घडवून आणलेला हा एक खूनच आहे. आणि त्या क्षणापासून सुशांतच्या मृत्यूला वेगळेच वळण लागले, आणि मग जणूकाही त्याची आत्महत्या नसून खून आहे. आणि खून नसुन आत्महत्याच आहे. असे तर्क लावण्याची जणू काही स्पर्धा सुरू झाली इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चर्चेच्या माध्यमातून शाब्दिक युद्ध रंगू लागले, शब्दांचे हल्ले, प्रतिहल्ले, दावे-प्रतिदावे, असे होत असतानाच आपल्या देशातील राजकीय पक्ष कसे दूर राहणार त्यांना सुद्धा हा मोह आवरता आला नाही. आणि त्यांनी सुद्धा या सुशांतच्या मृत्यू संगरात उडी घेतली आणि सुरू झाले सुशांतच्या मृत्यूचे महाभारत……!
असे की, महाभारतातील कुरुक्षेत्रातील रणसंग्रामाला देखील लाजवेल असे..! महाभारतातील युद्ध हे फक्त कुरुक्षेत्रातील युद्धभूमीपर्यंत मर्यादित होते पण येथे या युद्धात मात्र ज्या मातोश्रींने आतापर्यंत भल्या भल्यांना आपल्या वाग्बाणांनी घायाळ केलेले आहे. आता मात्र ते मातोश्री मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान त्या बाणांचे लक्ष होऊ लागले आहे.ज्याप्रमाणे महाभारतात चक्रव्यूह रचण्यात आले होते आणि त्यात युवराज अभिमन्यू सापडले होते. त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यू चक्रव्यूहात मातोश्रीच्या युवराजांना अटकविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु नेहमीप्रमाणे मातोश्रीच्या रथाचे सारथ्य संजयजी करत आहे. आणि सर्वांना उत्सुकता आहे की कोणते डावपेच वापरून युवराजांना या चक्रव्यूहातून सहीसलामत बाहेर काढतात हा येणारा काळच सांगेल.
परंतु ज्या मुंबई पोलिसांनी 26/11 चा हल्ला असो की, कोरोनाचे संकट असो प्रत्येक संकट समयी त्यांचे वीर बाहू स्फुरण पाउन मोठ्या धैर्याने संकटांचा सामना करून भारत मातेसह महाराष्ट्र देवतेचं रक्षण केलेलं आहे. कोरोना महामारी तर शेकडो पोलिसांनी आपल्या देहाचे दान दिले आणि हजारो पोलिस कोरोनाच्या डखांनी घायाळ होऊन सुद्धा ते महाभारतातील कर्णाप्रमाणे स्थितप्रज्ञ होते. त्यांचा एखाद्या बिग दिग्विजयी सम्राट सारखा चोहोबाजूंनी जयजयकार होत असताना सुशांतच्या मृत्यूच्या दलदलीत मात्र त्यांच्या रथाची चाके रुतून बसले आहे. त्यांना अवगत असलेल्या ब्रह्मास्त्राचा विसर पडला की काय? असेच सर्वांना वाटत आहे. आणि अनेकांच्या टीकेच्या बाणाने मुंबई पोलीस घायाळ होत आहे.
आतापर्यंत त्यांच्या सुरक्षेचे कवच लपेटून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस मुक्तपणे संचार करीत होत्या त्याच आता मुंबई पोलिसांवर विश्वास नाही आणि आता मुंबई सुरक्षित राहिली नाही असे विखारी बाण आपल्या मुखधनुष्यातून सोडत आहे. म्हणूनच की काय बिहारच्या योद्ध्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या सुद्धा तपासाच्या तलवारी खणाणल्या मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही.आणि मग रथी-महारथी (सीबीआय,ईडी) यांनी या रणसंग्रामात उडी घेऊन सुद्धा या युद्धाचा निर्णय लागत नाही आहे. परंतु यात मात्र महाभारतातील द्रौपदी प्रमाणे जो तो येत आहे आणि रिया चक्रवतीवर कधी 15 कोटीचा अपहार तर कधी ड्रग्स सेवनाचे आरोप करून तिची एक एक साडी सोडून तिच्या वस्त्रहरणाचा तमाशा संपूर्ण जग बघत आहे. आणि अशा रीतीने जो तो आपल्या तर्काचे घोडे चौफेर उघडून धुळीचे लोट उडून निघून जात आहेत. परंतु या उडालेल्या धुळीचा लोळामध्ये इथला शेतकरी,शोषित,कष्टकरी माणूस लॉक डाऊनमुळे उध्वस्त झालेला कामगार वर्ग मात्र दिसेनासा झालेला आहे. आणि हीच वेदना आम्हाला अस्वस्थ करीत आहे….!
महाभारताच्या चरित्राचे दाखले देण्याचे एकच कारण की, आज-काल वाचकांना साधी सरळ भाषा पचनी पडत नाही त्यामुळे सुद्धा कदाचित इथले मूळ प्रश्न दुर्लक्षित होत आहे. नोटबंदी लॉकडाऊनमुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. आणि करोडो तरुण सैरभैर होऊन उध्वस्त होत आहे. आणि त्यातील कित्येक तरुणांनी तर आत्महत्या करून मृत्यूला कवटाळले आहे. हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी तर सोडाच त्यांच्या परिवाराला साधे सात्वनाचे शब्ददेखील बोलायला वेळ नाही. आणि इकडे मात्र ज्यांच्या 4-4 गर्लफ्रेंड होत्या त्याच्या मृत्यूचने मात्र संपूर्ण भारत ढवळून निघत आहे.मृत्यू हा सर्वसामान्यांचा असो अथवा सेलिब्रिटीचा दुःख वेदना देणाराच असतो परंतु आम्हाला असे वाटते की, ज्याप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर करते आहे. त्याचप्रमाणे येथील शेतकर्यांच्या शोषित पीडित कष्टकर्यांच्या मृत्यूचे देखील गुड उकलण्याचा प्रयत्न करावा एवढेच आम्हाला म्हणायचे आहे.
नरेश बागडे
कार्यकारी संपादक साप्ताहिक केसरीराज