पुणे (वृत्तसंस्था) – रविवारी (२ मे) पश्चिम बंगालसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात सध्या देशभरात पश्चिम बंगालमधील निकालाची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्ष या निकालावरून भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकाल आणि पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक निकालाच्या अनुषंगाने थेट आव्हान दिले आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट केले आहे.
महाराष्ट्रात माझे आव्हान आहे. कोणत्याही निवडणुकीत चारही पक्षांनी वेगवेगळे लढून पाहावे, मग सर्वांना कल्पना येईल की कोणाला किती बोलण्याची पात्रता आहे. तीनही पक्ष एकत्रित असून सुद्धा पंढरपुरात आमचा पराभव करू शकले नाहीत, मग हे वेगवेगळे लढले तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही.