नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसने एकूण १८९ जागांवर विजय मिळवला आहे. या सर्व निकालांमध्ये खारदा विधानसभा मतदारसंघातून आलेला निकाल हा थोडा आश्चर्यकारक आहे. खारदा विधानसभा मतदारसंघातील तृणमूलचे उमेदवार काजल सिन्हा १८,५७३ इतक्या मतांचा आघाडी घेऊन विजयी झाले आहे. मात्र हा निकाल लागण्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली आहे. त्यामुळे याठिकाणी आता पुन्हा निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काजल सिन्हा यांचे काही दिवसांपूर्वीच करोनाने निधन झाले होते. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. २२ एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यासाठी खारदा विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झाले त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील खारदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या काजल यांचा २५ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. काजल यांना करोनाचा संसर्ग झाला होता आणि उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर काजल यांच्या पत्नी नंदिता यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुदीप जैन यांच्याबरोबरच निवडणुक आयोगातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. नंदिता यांनी निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप करताना करोना कालावधीमध्ये उमेदवार आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात आयोगाने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप नंदिता यांनी केला होता.