नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील राजकारणात काळाचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. कारण काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आले. त्यात अनेक ऐतिहासिक निकाल लागले. दरम्यान, यात भाजपला मोठा फटका बसला. या सर्वामध्ये उत्तर प्रदेशात काल ग्राम पंचायत निवडणुका झाल्या. पाच राज्यांच्या विधानसभा निकालामुळे युपीच्या या निकालांकडे फारसे लक्ष गेले नाही. परंतू भाजपासाठी महत्वाचे राज्य असलेल्या आणि योगी आदित्यनाथांची सत्ता असलेल्या या राज्यात भाजपाला मोठा फटका बसला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. कलांमध्ये बागपत आणि मथुरा जिह्यांमध्ये भाजपाला मोठ्या प्रमाणावर झळ बसली आहे. अद्याप अन्य जिल्ह्यांचे निकाल हाती येणे बाकी आहे. बागपत आणि मथुरामध्ये जाटांची संख्या मोठी आहे. या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये जाटांची ताकद आहे. असे झाल्यास जाटलँडमध्ये भाजपा आपले वर्चस्व गमावत असून अजित सिंह यांचा पक्ष आरएलडी त्याच वेगाने जाटांमध्ये ताकद वाढवू लागली आहे.
या दोन जिल्ह्यांसारखेच जर मुझफ्फरनगर, सहारनपूर, शामली, देवबंद आणि अलीगढमध्ये देखील जाटांमुळे भाजपा निवडणूक हरत असेल तर शेतकऱ्यांनी जाट आणि मुस्लिम समाजाची मोट बांधून भाजपाचा खेळ केला असे म्हणावे लागेल. सध्यातरी निकाल हाती येण्यास आणखी काही तास लागणार आहेत, मात्र, बागपत आणि मथुरा याकडे इशारा करत आहेत की, भाजपाने शेतकरी आंदोलनानंतर खूप काही गमावले आहे. बागपतमध्ये आरएलडीचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि भाजपा खूप मागे पडली आहे. मथुरामध्ये निम्म्य़ा जागांवर आरएलडी पुढे आहे. हे अंतिम निकाल नाहीत, तर सुरुवातीचे कल आहेत.
भाजपाचे नेते यावर काही बोलू इच्छित नाहीएत. त्यांना असे वाटत आहे की, अंतिम निकालानंतरच भाजपाची स्थिती समोर येईल. जाणकारांनुसार जाट आणि मुस्लिम मतदारांनी पंचायत निवडणुकीत एकत्र येऊन भाजपासमोर संकट उत्पन्न केले आहे. ही परिस्थीती उत्तरेकडील उत्तर प्रदेशची असताना उर्वरित राज्यात समाजवादी पक्ष भाजपाला कडवी टक्कर देत आहे. य़ामुळे ही निवडणूक भाजपासाठी कठीण ठरणार आहे.