नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राजकारणातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कोरोना लस टोचली आहे. या यादीत आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही समावेश झाला आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आर्मी रिसर्च आणि रिफरल हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात परवानगी असलेल्या सर्वांनी कोरोना लस टोचून घेण्याचं आवाहन केलं आहे.

राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती कोविंद यांनी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमेला यशस्वीपूर्वक पूर्ण करत असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ज्यावेळी कोरोना लस घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्याही उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं आहे.







