नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरातील आणि मुख्यत: पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ देशाच्या राजधानीत आंदोलन करत आहेत. त्यांनी शेजारी राज्यात जाणारे महामार्ग रोखून धरले आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या सोमवारी झालेल्या चर्चेत पोलीस आणि प्रशासनाकडून होणारा छळ थांबेपर्यंत सरकारशी कोणतीही चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. या चळवळीविरोधात सुरू असणारे सरकारी षडयंत्र तातडीने थांबवण्याची मागणीही मोर्चाने केली आहे. यावर आता काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना मोदी सरकारला सवाल विचारला आहे.
दरम्यान, नवाब मलिक म्हणाले,’शेतकऱ्यांचे अन्नपाणी बंद करणे ही लोकशाही नाही मोदी सरकारला जनता कधीच स्वीकारणार नाही. कारण या सरकारने दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असतांना येथील बॉर्डरचे छावणीत रुपांतरीत केले आहे. असे करून मोदी सरकार शेतकऱ्यांसोबत युध्द लढणार आहे का? असा त्यांनी मोदी सरकारला सवाल केला आहे.
ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी बंदोबस्त लावताय की चीन सीमेवर की पाकिस्तान सीमेवर बंदोबस्त लावताय ? असे छावणीत रूपांतर करणे म्हणजे शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम करणे होय हे योग्य नाही. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.







