अमळनेर ( प्रतिनिधी)- तालुक्यातील जवखेडा ते मांडळ या रस्त्याचे वर्षभरापासून सुरु असलेले काम अत्यंत निकृष्ट पद्धतीचे होत असून आता ऐन पावसाळ्यात ठेकेदाराने या रस्त्याचे डांबरीकरण सुरु केलेले आहे . या रस्त्याचा वापर करणाऱ्या गावांमधील ग्रामस्थांनी ठेकेदाराविरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

या ग्रामस्थांनी दाखल केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सुरु आहे वर्षभरापासून मनमानीपणाने हे काम सुरु आहे, ठेकेदार करीत असलेल्या कामाची तपासणी किंवा निगराणी संबंधित अधिकारी करीत नाहीत खाडी आणि मुरुमांचा वापर प्रमाणात केला जात नाही, त्यामुळे रस्त्यावरील चढ उतार वाढले आहेत शेजारच्या शेतांच्या चाऱ्यांमधून मुरूम काढून भराव टाकला जात आहे. या भरावाची दाबाई व्यवस्थित होत नसल्याने रस्त्यावरचे खोलगट चढ उतार वाढले आहेत खडी आणि मुरुमाचे थर कमी असल्याने रस्त्यात पाणी साचले आहे काम करणारांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून एस्टीमेट मध्येच अशी तरतूद असल्याचे सांगितले जाते डांबरीकरणासाठी २० मिमी जाडीची खडी वापरली जाते आहे जेथे दोन नाले एकत्र येतात त्या ठिकाणच्या फरशीवर प्रवाहाची दिशा विचारात न घेता भल्तायच दिशेने पाईप टाकले जात आहेत अपुऱ्या लांबीचे हे पाईप आहेत या कामाशी संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची चौकशी करून सुमारे चाळीस हजार लोकसंख्येचा हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.










