मुंबई (वृत्तसंस्था)- एरव्ही शिवसेनेच्या विरोधात भाष्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारला मात्र शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या याच विधानावरून सध्याराजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात चंद्रकांत पाटील यांचा नामोल्लेख न करता टीका केली आहे. ‘आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. आजही त्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील ठाम होते. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढू मात्र राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. याच विधानानंतर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.







