डोंबिवली (वृत्तसंस्था) – कोपर भागातील पश्चिमेला मीना विठू ही 42 वर्षे जुनी असलेली इमारत बुधवारी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास खचली. त्या घटनेची चाहूल शेजारील चाळीतील सिद्धार्थ कदम या रहिवाशाला लागल्याने त्याने तातडीने राकेश शिंदे नावाच्या त्या पडणाऱ्या इमारतीमधील रहिवाशाला सतर्क केले. त्यानंतर शिंदे आणि कदम या दोघांनी इमारतीमधील अन्य 14 रहिवाशांना जागे केले, आणि तात्काळ बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे तेथील सुमारे 75 नागरिकांचा जीव वाचला.

एकीकडे जीव वाचल्याचे समाधान असले तरीही डोळ्यादेखक्त 30 हून अधिक वर्षे उभा केलेला संसार मोडून पडल्याने अनेक रहिवाशांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. आमचा संसार मोडला, अधिच कोरोनाचे संकट आले, त्यात नोकऱ्यांचा पत्ता नाही, त्यामुळे आर्थिक चणचण असताना डोक्यावरचे छप्पर गेल्याने रहिवासी मानसिक तणावाखाली असल्याचे निदर्शनास आले.
त्या इमारतीमध्ये 4 पागडीचे रहिवासी तर अन्य भाडे तत्वावर वास्तव्याला होते. रातोरात इमारत कोसळते काय आणि सगळं होत्याचे नव्हते होते काय यावर विश्वास बसत नसल्याचे महिलांनी सांगितले. साखर झोपेत असताना एककम बाहेर पडा बाहेर पडा असा आरडाओरडा झाल्याने जे कपडे अंगावर होते त्यावरच रहिवाशांनी रस्त्यावर, मोकळ्या जागेत मिळेल तिथे धाव घेतली, सगळे कुटुंबातील नागरिक बाहेर येत नाही तोच इमारतीचा मागील भाग कोसळला आणि पै न पै गोळा केलेला संसार पत्याच्या बंगल्यासारखा कोलमडल्याची भावना महिलांनी बोलून दाखवली.







