जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव महानगर पालिकेच्या उपमहापौर पदाचा राजीनामा डॉ. आश्विन सोनवणे यांनी महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

भारतीय जनता पक्षातर्फे मागील काही महिन्यांपासून उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी राजीनामा देण्याविषयी हालचाली सुरु होत्या. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी राजीनामा देण्याचे आदेश केले होते. त्यानुसार डॉ. सोनवणे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिला आहे.
जळगाव महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. सुरूवातीला महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी डॉ. आश्विन सोनवणे यांची वर्णी लागली होती. सीमा भोळे यांनी जानेवारी महिन्यात राजीनामा दिल्यानंतर महापौरपदी भारती सोनवणे यांची निवड करण्यात आली. मात्र डॉ. सोनवणे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने सर्वच निवडणुकांना ब्रेक लावण्यात आला होता. दरम्यान महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड झाल्यानंतर मुदत संपलेल्या सर्वच पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी डाॅ. साेनवणे यांना उपमहापाैरपदाचा राजीनामा देण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार डॉ. आश्विन सोनवणे यांनी आज महापौरपदाचा राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे.







