अभिषेक पाटलांचे मनोज वाणी यांना प्रत्युत्तर

जळगाव (प्रतिनिधी) – खंडणीचे आरोप करतांना पुरावे असतील तर ते समोर आणावेत आणि पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करावा. मी खानदानी माणूस असून मला इतरांच्या पैशाची काही-एक गरज नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी ” केसरीराजशी ” बोलतांना दिली.
हनी ट्रॅप प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या मनोज वाणी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ” केसरीराज ” ने अभिषेक पाटील यांचीही प्रतिक्रिया जाणून घेतली. ते बोलतांना पुढे म्हणाले की, माजी सैनिकाच्या परिवाराकडून 17 लाख रुपये लुबाडल्याचे सांगणाऱ्या मनोज वाणी यांनी याबाबतचे पुरावे समोर आणावे व पोलिसात गुन्हा दाखल करावा.
हनी ट्रॅप प्रकरणात संबंधित महिलेला रामानंदनगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बोलावले तेव्हा त्या महिलेने जळगाव शहरातील 5 लाख लोकांपैकी फक्त मनोज वाणी यांनाच का फोन लावले ? म्हणजे मनोज वाणी आणि त्या महिलेचे काही शिजत होते ना ? असा प्रश्न उपस्थित करीत गाडेगाव घाटातील हॉटेल टर्निंग पॉईंटप्रकरणी जागा मालकावर गुन्हा दाखल झालेला नाही. ते हॉटेल एक पुण्यातील कंपनी चालवत होती आणि त्या वेळी दाखल झालेला गुन्हा खोटा होता.
आम्ही मागच्या पंधरा वर्षापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निस्वार्थीपणे काम करत आहोत, तसेच मला कोणाच्या फुकटच्या पैशांची गरज देखील नाही तर खंडणीचा विषय येत नाही. मी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वतः पैसे कमावणारा व्यक्ती आहे.
काही लोकांनी वेळोवेळी आपले नेते किंवा बाप बदललेले आहेत व कोणत्या कोणत्या प्रकारे ठेके मिळवले आहेत हे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावे व संबंधित त्या ठेक्यामधून मिळणारे पैशामधील किती लोकांचे पैसे देणे बाकी आहेत हे जनतेसमोर सांगावे. मी एक खानदानी घरातला मुलगा आहे. मला गैर मार्गाने मिळणाऱ्या पैशांची गरज नाही, असेही अभिषेक पाटील यांनी शेवटी सांगितले.







