जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील आदर्शनगरातील वाहने पेटविणार्या माथेफिरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
जळगावातील आदर्शनगरात १३ मे रोजी पहाटे विविध अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी असलेली सात वाहने पेटवल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. त्यात १८ लाख २८ हजारांचे नुकसान झाले होते. पोलीसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास सुरू केला होता. एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्यात आग लावणारा चित्रीत झाला होता. त्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शरीरयष्टी, वयाचा अंदाज घेऊन पोलिसांनी १५ दिवसात सुमारे ३० जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यातूनच आकाश गणेश महाजन (वय २१, रा. तांबापुरा) याला अटक करण्यात आली आहे. आकाश हा तांबापुरात राहणारा असून, तो काहीच कामधंदा करीत नाही. सायकलसह इतर किरकोळ वस्तू चोरी करून मिळेल त्या किमतीत तो त्या विक्री करतो. यातूनच दारू, गांजा, सोल्युशनची नशा करतो. नशेत असताना १३ मे रोजी त्याने पहाटे आदर्श नगरातील जय गुरुदेव अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मोटारसायकल पेटवली. यानंतर सात वाहने पेटवली. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याने वाहने जाळल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय खैरे, रेवानंद साळुखे, संजय सपकाळे, रवींद्र चौधरी, जितेंद्र तावडे, सुशील चौधरी, प्रवीण जगदाळे, अजय सपकाळे यांच्या पथकाने केली.