नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.

तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. तर त्यांच्या याच विधानाला समर्थन देत भाजपा नेत्या साध्वी प्राची यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
साध्वी प्राची म्हणाल्या,’आयएमएच्या माध्यमातून १९८२मध्ये एक एनजीओ (स्वयंसेवी संस्था) बनवली गेली होती. भारतात मदर तेरेसा नावाची एक जादूगार होती, जी लोकांना स्पर्श करूनच बरं करायची. त्यांचा मृत्यूही रुग्णालयात झाला होता,’ असं साध्वी प्राची यांनी म्हटलं आहे. यांनी एका व्हिडीओतून ही भूमिका मांडली आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’बाबा रामदेव यांनी संपूर्ण देशात आयुर्वेदा आणि योगाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनो लक्ष देऊन ऐका, वाटीभर पाण्यात बुडून मरा. लाज वाटू द्या.
बाबांनी कोट्यवधी लोकांना बरं केलं असून सद्यस्थिती भारतात धर्मांतराचा खेळ सुरू असून, केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी. माठातील पाण्यामुळे कुणीही आजारी पडत नाही, फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगत, पण परदेशी कंपन्यांचे दलाल ख्रिश्चन लोक याचा विरोध करतात.’असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
तत्पूर्वी, रामदेव यांनी आयएमएवर सनसनाटी आरोप केले आहेत. आयएमए केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले होते, ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात स्वामी रामदेव यांनी आयएमएवर निशाणा साधला होता.







