मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यभरात पुन्हा एकदा करोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दररोज तीन ते चार हजारांच्या संख्येने नागरिक संक्रमित होत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. अशातच केंद्र आणि राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेने एकत्र येण्याचा सल्ला काँग्रेस नेत्याने दिला आहे.

काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी म्हणाले कि, देशातील करोना रुग्णसंख्येपैकी १० टक्के नवीन रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. तर त्याचबरोबर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ६ टक्के वाटा मुंबईचा आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीच्या हितासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महापालिकेने एकत्र यायला हवं आणि प्रत्येक प्रौढ (१८ वर्षांवरील) मुंबईकरांचे होईल तितक्या लवकर लसीकरण करायला हवे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान, राज्यात रविवारी सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात 40,414 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.







