पुणे (प्रतिनिधी) – भाजप व राष्ट्रवादीने एकत्र येण्याचे ठरविले तर याची माहिती आधीप्रमाणे शपथविधी झाल्यानंतरच कळेल असे सूचक वक्तव्य आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी काढले. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदाबाद येथे कथित भेट झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळवले आहे. शाह यांनी या प्रकरणी सर्वच बाबी जगासमोर येत नसतात असे सांगून याबाबतचा सस्पेन्स वाढविला आहे. तर आता भाजपच्या अन्य नेत्यांनीही याला हवा देण्याचे काम सुरू केले आहे.
चंद्रकांत पाटील यांना शरद पवार आणि अमित शाह यांच्या 26 मार्चला अहमदाबादमध्ये झालेल्या कथित भेटीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी राजकारणात अशा भेटी झाल्या पाहिजेत, असे म्हटले. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं. मात्र, नेत्यांनी एकमेकांना भेटलं पाहिजे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार आल्यापासून अशा भेटीगाठी कमी झाल्या होत्या. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय कारणासाठी होते, असे नाही. त्यामागे एखादे समाजोपयोगी कारणही असू शकते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अशी भेट झालीच नाही, हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. यामुळे उलट शरद पवार आणि अमित शाह यांची भेट झाली हीच गोष्ट शिक्कामोर्तब होत आहे. महाविकासआघाडीचे नेते वारंवार सरकारला धोका नाही, असे सांगत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हेच सिद्ध होत असल्याचा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. भाजप आणि राष्ट्रवादीचं काही ठरलंच तर गेल्यावेळसारखं शपथविधी झाल्यावर कळेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.







