जळगाव (प्रतिनिधी) – वर्धा शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात हवा असलेला आरोपी मुकेश रोहिदास झाल्टे यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यास वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वर्धा शहर पोलीस स्टेशनला पीडित महिलेने फिर्याद दिली होती. इंस्टाग्राम सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर सदर महिलेचे अश्लील फोटो अपलोड केले, म्हणून बदनामी झाली म्हणून तिने तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून वर्धा शहर पोलीस तपास करीत होती.
गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून मुकेश रोहिदास झाल्टे (वय २२) रा.रामेश्वर कॉलनी याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पहाटे पाच वाजता त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. यानंतर त्याला वर्धा शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास सातदिवे, पोलीस नाईक इमरान सय्यद यांनी केली आहे.







