नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात दररोज तीन लाखांच्या घरात कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडत आहेत. अशा स्थितीत भारताच्या मदतीला अनेक देश पुढे आले आहेत. अनेक देशांनी ऑक्सीजन सहित इतर वैद्यकीय साहित्य भारताला पुरवले आहे. तसेच कोरोनाच्याया लढाईतून मुक्त होण्यासाठी भारतानं लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भारतीय लष्करानेही लष्कराची रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. देशातील परिस्थिती बाबत बोलण्यासाठी लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी भारतीय सैन्यदला कडून घेतल्या जात असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली व चर्चा केली आहे.

याबाबत बोलताना नरवणे यांनी सांगितले की, लष्कराकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी शक्य असेल त्या ठिकाणी रुग्णालये सुरु केली जात आहेत . नागरिक त्यांच्या जवळील रुग्णालयात जाऊ शकतात. लष्कराचे वैद्यकीय व कर्मचारी विविध राज्य सरकारांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत याशिवाय देशभरात विविध ठिकाणी लष्कराकडून तात्पुरती रूग्णालयात देखील सुरू केली आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले आयात केलेले ऑक्सिजन टँकर आणि वाहन व त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक असेल तिथे सैन्यदल मनुष्यबळासह मदत करत आहे.







