जळगाव( प्रतिनिधी ) – गणपती नगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच गल्लीत मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने पेट्रोल टाकून दोन कार आणि एक दुचाकी पेटवून जाळल्याची घटना आज घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणपती नगरातील सातपुडा हाउसिंग सोसायटी येथे मिलन सलामतराय तलरेजा ( वय – ३० ) आपल्या कुटुंबीयांसह राहायला आहे. त्यांचे ऑटोपार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ३. ३० वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूने कापडावर पेट्रोल टाकून कार क्रमांक (एमएच १९ डीव्ही ४१९३) आग लावून पेटवून दिली. दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांन फोन करून कारला आग लागल्याची माहिती मिलन तलरेजा यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत या आगीमध्ये कारचे जळून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे तलरेजा यांनी आठ महिन्यापूर्वीच ही कार विकत घेतली होती. त्याच पद्धतीने त्यांच्याच गल्लीत राहणारे श्रीचंद घनश्यामदास अडवाणी ( वय – ४७ ) यांची देखील कार क्रमांक (एमएच १९ सीझेड २२७७) आणि इलेक्ट्रॉनिक दुचाकी (एमएच १९ डीझेड ७२४४) यांच्यावर देखील त्याच पद्धतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार घडला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी बोरींगच्या सहाय्याने आग विझविली. या संदर्भात मिलन तलरेजा यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहे.