पिंपरी (वृत्तसंस्था) – करोनामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली असली तरी कर्मचारी महासंघासोबत झालेल्या करारनाम्यानुसार यावर्षीही महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जाणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी ‘गोड’ होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अस्थापनेवर सुमारे सात हजार कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या कर्मचारी महासंघाचा महापालिकेसोबत करारनामा झाला असून या करारनाम्यानुसार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. करारनाम्याचे हे शेवटचे वर्ष आहे. सध्या करोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. तर शासनाकडून येणाऱ्या अनुदानातही मोठी घट झाली असून केवळ 33 टक्केच अनुदान महापालिकेला प्राप्त होत आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता.
मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिवाळी बोनस देण्याबाबत सकारात्मक संदेश दिला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महापालिका आणि कर्मचारी महासंघात झालेल्या करारनाम्यानुसार बोनस द्यावा लागणार आहे. त्यासाठी पैशांची सोय केली जात आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत बोनस देण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचेही हर्डीकर यावेळी म्हणाले. आयुक्तांनी दिलेल्या या संकेतामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे.







