एलसीबी, चोपडा पोलिसांच्या पथकांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुन्हेगारांकडून गावठी कट्ट्यांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर चोपडा शहर व जळगाव गुन्हे शाखेने सापळा रचत संयुक्त कारवाई करून तिघा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. किरणकुमार बकाले व चोपडा शहर पो.स्टे.चे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मध्यप्रदेशातून गावठी कट्ट्याची वाहतूक चोपडा शहरातून होणार असल्याची माहिती मिळाली होती. उमर्टी, ता. वरला, मध्यप्रदेश येथून गावठी बनावट शस्त्रे खरेदी करून चोपडा शहरात येत असल्याचे कळले होते. त्यानुसार दोन पथकांची निर्मिती करून रवाना करण्यात आले होते. येथील एका पथकाने चोपडा शहरात चुंचाळे ते चोपडा रस्त्यावर सार्वजनिक शौचालयाजवळ शनिवारी २८ रोजी दुपारी ३ वाजता आकाश माधव सानप (वय-२४) रा. चिंचोल व महेश निवृत्त सानप (वय-२४) रा. वडगावपिंगळा दोघेही ता सिन्नर, जि. नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार हजार रुपये किमतीचे चार काडतूस असा २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोकॉ. दिपककुमार शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर शनिवारी संध्याकाळी ५ वाजता दुसऱ्या पथकाने चोपडा ते चुंचाळे रस्त्यावर स्मशान भूमिजवळ संशयित मयूर काशिनाथ वाकडे (वय-२२) रा. अरुण नगर, चोपडा यांच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा पिस्टल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन काडतूस असा २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी (एम.एच.१९ डी.एच.४०५४) जप्त करण्यात आली. याबाबत चोपडा शहरचे पोकॉ. प्रकाश मथुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तिघेही संशयितांची पार्श्ववभूमी गुन्हेगारीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.







