मुंबई (वृत्तसंस्था) – ‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकली हे महत्त्वाचे आहे. आता ते मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, विरोधकांच्या कुंडल्या घेऊन मी बसलो आहे, मग हे विधान धमकीचे नव्हते का? असा सवाल करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जशास तसे उत्तर दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना पाहण्यास मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
‘मुळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ऐकली हे महत्त्वाचे आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आनंदाचा आहे, विरोधी पक्षानं त्यांच्या पद्धतीने वर्षपूर्ती साजरी केली, त्याचा मी आदर करतो. फडणवीस हे मुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, मी विरोधकांच्या कुंडल्या घेऊन बसलो आहे. मग ही कोणती भाषा होती. त्यांची अनेक विधान माझ्या स्मरणात आहे. पण त्यांचे हे विधान गंभीर होते, धमकी देणारे नव्हते का? असा उलट सवाल राऊत यांनी फडणवीस यांना विचारला आहे.
तसंच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा आहे. जर एखादी तपास यंत्रणा दबाव टाकण्यासाठी वापरली जात असेल तर राज्याचे प्रमुख म्हणून टीका करणारच. केंद्रीय संस्था बेकायदेशीरपणे मागे लागेल असेल तर त्याला तशाच भाषेत उत्तर देऊ. जर कुणाला हे पटत नसेल तर त्यांनी टीका करावी. विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी खोटेपणाचा आश्रय घेऊ नये’ असा सणसणीत टोलाही राऊत यांनी फडणवीस यांना लगावला.
‘आज भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, मुख्यमंत्री हे पंतप्रधानांच्या स्वागताला जात नाही. त्याने आधी पंतप्रधान कार्यालयातून घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदी हे तीन राज्यात गेले आहे. तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्वागतासाठी न येण्याची सुचना दिली आहे. भाजपकडून आमदारांनाही माहिती पुरवली पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती पुरावा लागला म्हणून त्यांनी कारवाई केली. मग यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखे आहे काय?न्यायालयाचा आदर राखून बोलत आहोत, न्यायालयाने निर्णय दिला आहे. मात्र, यावर राष्ट्रपती राजवट लावावी, असं कोणी म्हणत असेल तर त्यांनी मागणी करावीच. मुळात त्यांनी कायदा व्यवस्थित वाचलेला नाही. त्यांनी संविधानाचे नीट वाचण करावे, असा टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला.







