मुंबई (वृत्तसंस्था ) – मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा हा तोडगा सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या मराहाष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) १२ वाजता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर संभाजीराजेंनी महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही संभाजीराजे भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणावर या दोघांशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेत आपली भुमिका मांडणार आहेत.
बाळासाहेब थोरात यांच्याशी संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीय नेतृत्त्व एकत्र आणण्यासाठी संभाजीराजेंचा भेटी घाठींचा सपाटा सुरुच आहे. संभाजीराजे असं म्हणाले की राजकीय पक्षांनी सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यासपेक्षा एकत्र येत मार्ग काढला पाहिजे. त्यामुळेच, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी संभाजीराजे भेटी घेत आहेत. दरम्यान, या नंतर आज (२८ मे) संध्याकाळी पत्रकार परिषद घेत संभाजीराजे मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर ते पुन्हा मिळवण्यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप खासदार संभाजीराजे हे देखील आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी काल (२७ मे) सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी संभाजीराजे आणि शरद पवार यांच्यात १५ मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सकारात्मक झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नारायण राणे या सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा’, अशी विनंती देखील संभाजीराजे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.
मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे देखील पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीराजे यांनी गुरुवारी (२७ मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत.
राज ठाकरेंच्या भेटींनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ‘राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं ते नातं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे त्याबाबत देखील आमची चर्चा झाली’, असे संभाजीराजे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे आरक्षण कसे मिळवता येईल याचसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार यांची भेट घेतली तर दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘मी माझ्या समाजासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेत आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची आहे’, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
‘उपसमितीच्या बैठकीत काय झालं, त्याची मला कल्पना नाही. पण आम्ही आमच्या बाजूने काम सुरू केलं आहे. राज्यातले सर्व समन्वयक, कायदेतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे की या परिस्थितीतून आपण बाहेर कसं पडायचं? सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यापुढे नेमकं काय आहे? ही केंद्राची जबाबदारी आहे की राज्याची जबाबदारी आहे? १०२ व्या घटनादुरुस्तीमध्ये काय सिद्ध होणार आहे? या सगळ्याचा अभ्यास सुरू आहे. २८ तारखेला पूर्ण समाजाच्या वतीने आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू’, असं ते म्हणाले आहेत.
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला संभीजीराजे छत्रपती यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिले. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.







