मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यातील ठाकरे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध दारूविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावरून विरोधी पक्ष भाजपने ठाकरे सरकार वर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
दारुबंदी उठवून गुन्हेगारी कमी होईल असा जावई शोध या ठाकरे सरकारने लावला आहे. येत्या काळात रेशनिंग दुकानावर दारू वाटायला पण हे सरकार मागे पुढे पहाणार नाही,’ असं ट्विट सातपुते यांनी केलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे सरकारचा कारभारावर भाष्य करताना, अंधेर नगरी चौपट राजा असा उल्लेख केलाय.
दारुबंदीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीत वाढ झाली. दारूबंदीपूर्वी म्हणजे २०१०-२०१४ या काळात १६ हजार १३२ गुन्हे दाखल झाले होते. दारूबंदीनंतर म्हणजे २०१५-२०१९ या काळात ४० हजार ३८१ गुन्हे दाखल करण्यात आले. दारूबंदीपूर्वी एक हजार ७२९ महिला गुन्हेगारीची प्रकरणे होती. दारूबंदीमध्ये ४०४२ महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर बालकांचा अवैध दारूसाठी वापर करण्याची संख्याही वाढली.