जामनेर ( प्रतिनिधी ) – पहूर येथील राजश्री कोटेक्सजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
पहूर येथील जामनेररोड लगत राज्यश्री कोटेक्सजवळ काल रात्री भीषण अपघात झाला अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल क्रमांक एम. एच.०५ सी. डी.४०३२ वरील मोटारसायकलस्वार ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (वय ५०, रा- शेंदुर्णी लिहा तांडा ) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी सरला सोनवणे (वय ४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात मयताच्या नातेवाईकांची चौकशी व सांत्वन केले. त्यांनी गंभीर जखमी असलेल्या सरला सोनवणे यांच्यावर उपचार करण्याच्या सुचना दिल्या. रात्री उशीरापर्यंत पहूर पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.