जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीसमोर रेल्वेच्या डाऊन लाईनवर एसटी चालकाने रेल्वेखाली उडी घेत आज आत्महत्या केल्याने जिल्हाभरात एस टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
मनस्थिती ठीक नसल्याने या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात आले . घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले व त्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेला आहे.
शिवाजीनगर अमरधाम समोर खांबा क्रमांक ४२०/२९/अ डाऊन लाईनवर सकाळी १० वाजेपुर्वी रेल्वेखाली आल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. १०.३० च्या सुमारास ही घटना गँगमनच्या निर्दर्शनास आली. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार करुणासागर जाधव व आरपीएफचे सुरेश मीना हे पोहचल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात झाली.
रुग्णवाहिका पोहचल्यानंतर दुपारी मृतदेहाचे खिसे तपासले असता एक डायरी मिळून आली. डायरीत असलेले ओळखपत्र आणि सुसाईड नोट वरून त्यांची ओळख पटली आहे. माझी मनस्थिती खराब असल्याने मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येशी माझ्या परिवाराचा काहीही संबंध नाही असा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवाजी पाटील यांच्या आत्महत्यामुळे जळगाव जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या आत्महत्येची नोंद झाली आहे.