चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम पाटील, प्रफुल्ल पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ मार्चरोजी शुभम पाटील (रा. घुमावल बुद्रुक ता.चोपडा) याने २५ वर्षीय महिला घरात एकटी असतांना तीचे स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबत व्हीडीओ कॉल करुन काढलेले व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर टाकुन बदनामी करण्याची धमकी देवून जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर २७ मार्चरोजी सकाळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी महिला घरात एकटी असतांना स्वयंपाक रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. महिलेने आरडा ओरड केल्याने पळुन गेले. याबाबत महिलेने पती, सासू, सासरे यांना सांगितल्यावर जाब विचारण्यासाठी सासु, सासरे गेले होते. त्यांना शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. या महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. अवतारसिंग टी. चव्हाण करीत आहेत.