नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रजासत्ताक दिनाला आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारा युवक नेमका कोण होता हा प्रश्न अनेकांना पडला. आता याबद्दलची महत्तवपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या व्यक्तीचं नाव जुगराज सिंग असून तो पंजाबच्या तरणतारण गावचा रहिवासी आहे. सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवरील व्हिडिओ पाहून कुटुंबीय आणि गावातील लोकांनी त्याला ओळखलं आहे. ही बातमी पाहिल्यानंतर जुगराज सिंगचे वडील बलदेव सिंग, आई भगवंत कौर आणि आपल्या तिन्ही मुलींना घेऊन कुठेतरी निघून गेले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जुगराज सिंगचे आजोबा महिल सिंग आणि आजी गुरचरण कौर यांनीदेखील लाल किल्ल्यावर केशरी झंडा फडकवणारा जुगराज सिंगच असल्याचं ओळखलं आहे. जुगराज सिंगचे कुटुंबीय बॉर्डर लगत असणाऱ्या जमीनीवर शेती करतात. जुगराज सिंगच्या परिवाराने सांगितलं, की त्यांच्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
जुगराज सिंगच्या आजीनं सांगितलं, की त्यांचा नातू गुरुद्वारामध्ये निशान साहिबवर चोला साहिब चढवण्याची सेवा करायचा. गावात सहा गुरुद्वारा आहेत. या सगळ्या गुरुद्वारांचं काम त्याच्याकडेच सोपवलं गेलं होतं. पुढे त्या म्हणाल्या, की ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लोकांच्या बोलण्यात येऊन त्याने दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला असेल.
गावातील लोकांनाही जुगराज सिंगच्या या कृत्यामुळे धक्का बसला आहे. गावातील प्रेम सिंग नावाच्या व्यक्तीनं म्हटलं, की जुगराज सिंग मेट्रीक पास आहे. 24 जानेवारीला गावातून 2 ट्रॅक्टर घेऊन शेतकरी आंदोलनाला निघाले. जुगराज सिंगदेखील याच ट्रॅक्टरमधून दिल्लीला गेला होता. आम्हाला हे ऐकून धक्का बसला की जुगराज सिंगनं असं काम केलं.गावातील लोकांचं म्हणणं आहे, की आम्हाला वारंवार असं सांगितलं गेलं, की ट्रॅक्टर रॅली शांततेत काढली जाणार आहे. मात्र, हे सगळं वातावरण कधी बदललं ते समजलंच नाही.







