जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल येथील नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर व डॉ. गीतांजली ठाकूर ह्यांनी सुखकर्ता फाउंडेशन मार्फत एरंडोल परिक्षेत्रात कोरोना महामारीच्या काळात आरोग्यक्षेत्र , वैद्यकीय प्रबोधन , जनजागृती व सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल मुंबई येथील राजभवन ह्याठिकाणी एका दिमाखदार समारंभात राज्यपाल भगतसिंह कोशियारी ह्यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ नरेंद्र ठाकूर ह्यांचा सन्मान करण्यात आला !

महाराष्ट्र राज्यातील पन्नास खाजगी वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रातील विविध शाखेतील डॉक्टर्स , आरोग्यसेवक व फार्मसी व्यावसायिक ह्यांचा ह्या कोरोनावीर सन्मानसोहळ्यात समावेश होता.
राजभवन , मुंबई येथे शासकीय प्रोटोकालानुसार हा सन्मानसोहळा दिनांक २७ डिसेंबर रोजी पार पडला.
राज्यपाल ह्यांनी ह्याप्रसंगी कोरोनाकाळात ह्या कोरोनावीरांनी केलेल्या कार्याची दखल इतिहास निश्चित घेईल आणि ह्यापुढेही मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून सर्व कोरोनावीर व वीर नारींनी आपले कार्य सुरु ठेवावे असे आवाहन करून शुभेच्छा दिल्या !
एरंडोल परिक्षेत्रात सुखकर्ता फाउंडेशन ह्या सेवाभावी संस्थेमार्फत स्वनिधीतून विविध आरोग्य व समाजोपयोगी उपक्रम हे दाम्पत्य राबवित असतात. डॉ. नरेंद्र व डॉ. गीतांजली ठाकूर ह्यांना ह्यापूर्वी हि विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त झालेले असून ,राज्याच्या सर्वोच्च संवैधानिक पदावरील महनीय नेतृत्वाकडून मिळालेला ह्या कोरोनावीर सन्मान मिळाल्याबद्दल डॉ. नरेंद्र व डॉ. गीतांजली ठाकूर ह्यांचे वैद्यकीय , सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.







