मुंबई (वृत्तसंस्था) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. यानिमित्त राष्ट्रवादी नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटवरून खास शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यांच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे आणि अजित पवार फोटोत एकाच इलेक्ट्रीक वाहनामध्ये बसलेले दिसत आहेत. पण यातली सूचक गोष्ट म्हणजे फोटोतील गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे, असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्या हाती असून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितले. अजित पवारांनी शुभेच्छा देताना ट्विट केलेल्या फोटोचा उद्धव ठाकरेंच्या विधानाशी सोशल मीडियावर संबंध लावला जात आहे.