जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील तुळजाई नगर येथे देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाला एकाने छातीवर डाव्या पायावर, कमरेवर चाकूने वार केले. त्यानंतर उपचारासाठी मित्रांसोबत जात असतांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या जवळ उड्डाणपूला खाली पुन्हा संशयित आरोपी येऊन तरुणाच्या मित्राला शरीरावर चॉपरने वार करून पैशांचे पाकीट आणि मोबाइलला हिसकावून घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष सुभाष कोळी (वय-२१) रा. कुसूंबा आयटीआय जवळ याने फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दुचाकीने तुळजाई नगर येथे देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्यावेळी काही एक कारण नसतांना गोलू चौधरी रा. तुकारामवाडी याने फिर्यादीच्या अंगावर धावून येत छातीवर, कमरेवर, पायावर चाकूने वार केले. फिर्यादी संतोष कोळी हा जीव वाचवत पळत सुटला तो एमआयडीसी पोलीस स्टेशनला आला. तेथे पोलिसांनी वैद्यकीय मेमो देऊन देवकर हॉस्पिटल येथे पाठविले. त्यातून पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात जात असतांना सोबत असलेला मित्र पंकज गणपत सोळुंके याच्यासोबत निघाला. त्यावेळी डॉ. पाटील रुग्णालयाच्या अलीकडे असलेल्या उड्डाण पुलाखाली संशयित आरोपी कुणाल पाटील, राहुल बऱ्हाटे, गोलू चौधरी, मयूर चौधरी यांनी पंकज सोळुंके याला डोकयावर, पाठीवर, उजव्या मांडीवर, गुढघ्यावर चॉपरने वार केले. तसेच फिर्यादीचे पैशाचे पाकीट आणि मोबाइलला देखील हिसकावून घेण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.







