लठ्ठ म्हणून वारंवार जिव्हारी लागणारा अपमान
अन लग्न मोडण्याच्या धमकीने जीव घेतला
जळगाव ( प्रतिनिधी ) – हुंडा आणि दागिने लग्नात देण्याचे ठरलेले असताना त्याआधीच मागणी , दागिने व रोख रक्कम रावेरात जाऊन दिल्यावरही ऐनवेळी भुसावळात लॉन्सवर लग्न आयोजनाची मागणी , लठ्ठ म्हणून भावी पती भूषणकडून वारंवार केला जाणारा जिव्हारी लागणारा अपमान आणि लग्न मोडण्याची धमकी ….. या कारणांमुळे उद्विग्न झालेल्या पानाचे कुऱ्हे येथील रामेश्वरी नागपुरे या नवरीने घरातच गळफासाने आत्महत्या केली !
लग्नाआधीच हुंड्याचे दागिने व पैशांसाठी होणारा छळ, भावी पतीनेच लठ्ठ म्हणत हिणवले व लग्न मोडण्याची धमकी दिल्यामुळे रामेश्वरी रवींद्र नागपुरे ( २४, रा. कुन्हे, पानाचे, ता.भुसावळ) या उच्चशिक्षित तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संताप व्यक्त होत आहे तिचा लग्न ठरलेला पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी आधी घेतली नंतर मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर निष्पाप रामेश्वरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारी शिरसोली येथे लग्न असल्याने रामेश्वरीचे वडील व आई विद्या लग्नाला गेल्या होत्या रामेश्वरी भुसावळ येथे जीमला गेली होती. दुपारी घरी आल्यावर तिने वडिलांना फोन केला होता . चार वाजता आई. वडील घरी आले असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही रामेश्वरी दरवाजा उघडत नसल्याने तिचा चुलत भाऊ जीवन व इतरांनी दरवाजा तोडला त्यावेळी आत रामेश्वरीने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
होणारा पती व सासू यांच्याकडून होणारा छळ, असह्य टोमणे व अवास्तव अपेक्षा यामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून तिच्या वडिलांनी भुसावळ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. तेथून मृतदेह जळगावला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी गुन्हा दाखल होण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदन रोखण्यात आले होते,
कुन्हे पानाचे येथील रामेश्वरी नागपुरे हिचे रावेर येथील भूषण याच्याशी लग्न ठरले होते. ६ मार्च रोजी साखरपुडा झाला होता, १८ मे रोजी विवाहाचा मुहूर्त
काढला होता. हुंडा म्हणून तीन तोळे सोने व ५० हजार रुपये रोख लग्नाच्या दिवशी देण्याचे ठरले होते परंतु साखरपुडा होताच काही दिवसांनी भूषण व त्याच्या आईकडून दागिने व पैशांचा तगादा सुरू झाला. गेल्या आठवड्यात ‘आम्ही जळगावात आलो आहोत, आम्हाला आजच दागिने व रोख रक्कम द्या’, म्हणून सांगितले. त्यासाठी रावेर येथे बोलावले. तेथे दागिने व रोख रक्कम दिली.
त्यानंतर दोन-तीन दिवसांत पुन्हा भूषणकडून रामेश्वरी हिला हिणवणे सुरू झाले. तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही तर भुसावळात लॉनवर करायचे असे सांगून दम देत होता
जाड म्हणून हिणवत असल्याने रामेश्वरी हिने भुसावळात जीम लावली. तेथील फोटो तिने भूषणला पाठविले. त्यावर त्याने आता काय उपयोग जीम लाऊन असे बोलून खच्चीकरण करीत होता. प्रत्येक वेळी भूषण व त्याच्या आईच्या अपेक्षा वाढतच होत्या, शुक्रवारी रात्रीदेखील दोघांमध्ये बोलणे झाले होते. असे रामेश्वरीचे चुलत भाऊ जीवन नागपुरे यांनी सांगितले.