सांगली ( वृत्तसंस्था) – संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा आहे. अशा भाटांची धनगर समाजाला आवश्यकता नाही, अशी बोचरी टीका भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. संजय राऊत खातात शिवसेनेचं पण जागतात पवारांच्या निष्ठेला, असेही पडळकर यांनी म्हटले. ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

तत्पूर्वी संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन, असे फडणवीस म्हणतात. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही असेच वक्तव्य केले होते. ते मला चांगले आठवत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करु नये, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. सरकार पाच वर्ष टिकेल याबद्दल शंका नाही” असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आम्हा सर्व पक्षांमध्ये सामंजस्य आहे, यात कुठलेही मतभेद नाहीत, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. ते बारामतीमध्ये बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तिन्ही पक्षाचे नेते घेण्यात आले, असं शरद पवारांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचं काम करतात, असं पवारांनी सांगितलं.







