पारोळा (प्रतिनिधी) – सरपंच सेवा संघातर्फे देण्यात येणारा मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा हा राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार डॉ.पाकीजा उस्मान पटेल यांना जाहीर झाला आहे. शिर्डी येथे 6 जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या वीस वर्षापासून करीत असलेल्या सामाजिक शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. डॉ. पाकिजा पटेल यांनी आतापर्यंत आपल्या कर्तुत्वाने सर्व क्षेत्रांमध्ये ठसा उमटविला आहे. त्यांची दखल समितीने घेतली.
6 जानेवारी रोजी शिर्डी येथे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार, पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाने , राष्ट्रीय कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकिजा पटेल यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आतापर्यंत पटेल यांनी 81 पुरस्कार पटकाविले आहेत. राजवड गावात आनंदाला उधाण आले आहे. सर्वत्र जल्लोष होत आहे. मित्र परिवाराकडून अभिनंदनच्या वर्षाव आहे.