जळगाव ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील जामने (सार्वे) येथील २६ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने कापसाचे उत्पादन न आल्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. राहुल राजेंद्र पाटील (वय २६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.
जामने येथील राहूल पाटील यांनी वडीलांकडून पाच एकर जमीन कसण्यासाठी घेतली होती. त्यात कापसाचे पीक लावले हाेते. परंतु, अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक वाया गेले. केलेला खर्चही निघाला नाही. वडिलांचे पैसे कसे द्यायचे व संसार कसा चालवायचा या विवंचनेत त्याने शेतातील शेडवर जावून गळफास लावून आत्महत्या केली
दरम्यान, त्यांचे लहान बंधू गणेश पाटील हे साेमवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना हा प्रकार आढळून आला. पिंपळगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास स फौ विजय माळी करत आहेत. मृत राहुल पाटील यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, अडीच वर्षांची मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे.