भिलपुरा परिसरात शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गजबजलेल्या घाणेकर चौक ते भिलपूरा चौकीदरम्यानच्या रस्त्यावर नूर बॅन्डजवळ सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्डयावर सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी शैलेश सुरेश सुरळकर ( वय ३८ रा. जोशीपेठ) व शरद भगवान चौधरी (वय ५५ रा. मेस्कोमाता नगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ हजार २५० रुपयांची रोकड तसेच सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विठ्ठल ससे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉस्टेबल दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल किरण वानखेडे, राहूल पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने सोमवारी सकाळी१० वाजेच्या सुमारास नूर बॅन्डच्या बाजूला गल्लीत भिंतीच्या आडोश्याला सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या खेळावर छापा टाकला. तसेच शैलेश सुरळकर व शरद चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत १ हजार २५० रुपयांची रोख रक्कम तसेच घटनास्थळावर मिळून आलेले सट्ट्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरुन शैलेश सुरळकर व शरद चौधरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दिनेशसिंग पाटील, अमोल विसपुते, अश्विन हडपे करीत आहेत.