जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील हॉटेल सुमेरसिंग येथील ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा विजेच्या धक्का लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुकेश भुसारी (वय-४२) हा आपल्या परिवारासह रा. भवानी नगर, नशिराबाद, ता.जि.जळगाव येथे राहायला होता. गावातील हॉटेल सुमेरसिंग येथे नोकरीला होता. गुरूवार २४ नोव्हेंबर रोजी मुकेश भुसारी हा कामावर असतांना त्यांला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यांला सोबत असलेल्या कामगारांनी लगेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासणी नंतर मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.