चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा ते अडावदच्या दरम्यान ट्रक चालकाची लूट करणार्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
काल पहाटे चोपडा तालुक्यात ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली होती. देवलीया (गुजरात) येथील रहिवासी हेमुभाई पोपटभाई अनियालिया(वय ३९) हे २५ रोजी पहाटे तीन वाजता चोपडाकडून गुजरातकडे ट्रकने (क्र.जी.जे. ०३-ए.टी.०२१८) कपाशीचे बियाणे भरून जात होते. वाटेत वर्डी फाट्याजवळ रवींद्र राजेंद्र कोळी (वय २३), राहुल एकनाथ पाटील(वय १९), सोनू उर्फ नितीन ज्ञानेश्वर कोळी (वय २३), भुरा उर्फ धनराज गोकुळ सोनवणे (वय २३), गजू उर्फ गजानन किशोर पाटील (वय २१), रवींद्र सुरेश कोळी(वय २९) या सर्व वर्डी येथील रहाणार्यांनी यांनी एम.एच.१९-एक्स-८२२५ क्रमांकाच्या वाहनाने ट्रकचा पाठलाग केला. बुधगाव फाट्याच्या पुढे त्यांनी ट्रक थांबवून काचा फोडून चालकाकडून ५० हजार रुपये व दोन बॅटर्या लुटून नेल्या. याप्रकरणी ट्रकचालक हेमुभाई अनियालिया यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार कारवाई झाली.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. यात पीएसआय अमरसिंह वसावे यांनी वर नमूद केलेल्यांना काही तासांतच ताब्यात घेतले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.