मुंबई (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे, भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

देशात फक्त ‘कू’ या समाजमाध्यम ॲपनेच नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार केला आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्विकार न केल्यामुळे इतर सोशल माध्यमांवर टांगती तलवार आहे. मात्र, फेसबुकने केंद्र सरकारकडे 6 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे, तूर्तास फेसबुक बंद होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, फेसुबक बंदच्या चर्चेत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करुन खरंच, फेसबुक आणि ट्विटरवर बंदी येणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर, पेट्रोल दरवाढीच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियाने उठवलेला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न नाही ना, असे संकेत त्यांनी दिले आहेत. तर, ट्विटर आणि फेसबुकनंतर पुढचा नंबर कोणाचा? असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरुद्धच्या धोरणाला या सामाजिक माध्यमांतून तीव्र विरोध झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.







