पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील नांद्रा येथुन जवळच असलेल्या कुरंगी गावच्या सोनटेक शेती शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतमजूरावर शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्याने जीवघेणा हल्ला चढवला. परंतु हल्ला होताच शेतमजूराने जोरजोराने आवाज दिल्यावर आसपासच्या शेतकऱ्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी आरोळ्या मारल्या. तसेच शेतमजूराने घाबरुन न जाता बिबट्याच्या हल्ल्याचा प्रतिकार केल्यामुळे शेतमजूर जबर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी, ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा नगरपरिषदेच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
राजेश बापू लोहार (वय वर्षे २६) हा मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत आहे. राजेश लोहार हा दोन मित्रांसोबत नगराज ताराचंद पाटील यांच्या शेतात रोजंदारीवर कामाला गेलेला होता. शेतात काम करत असतांनाच सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवला. हल्ला होताच राजेश याने बिबट्याला प्रतिकार करत जोरजोरात आरोळ्या मारल्या. जवळच असलेल्या मित्रांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यात बिबट्याने घाबरुन पळ काढला मात्र बिबट्याच्या हल्ल्यात राजेश लोहार याच्या दोघ हातावर व शरिरावर जखमा झाल्या आहेत.
ग्रामस्थांच्या मदतीने नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पाचोरा येथील नगरपरिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेबाबत पाचोरा वनविभागाला कळवण्यात आल्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडित, वनपाल पी. बी. देवरे, वनरक्षक प्रकाश सुर्यवंशी व वाहनचालक सचिन कुमावत यांनी पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात येऊन जखमी राजेश लोहार यांनी घटनेची माहिती घेतली. घटनेचा पंचनामा करण्यासाठी सोनटेक शिवाराकडे अधिकारी उपस्थित झाले आहे.