पुणे ( प्रतिनिधी ) – पुण्यात चोरट्यांनी चक्क ज्वेलरी शॉपच्या शेजारी दुकान खरेदी केले. त्या दुकानातून ज्वेलरी शॉपच्या भिंतीला भगदाड पडले, भगदाडातून ज्वेलरी दुकानात शिरत लाखोचे सोने गायब केले वारजे परिसरातील इंडिया रोडवरील माऊली ज्वेलर्समध्ये ही घटना घडली 1 किलोपेक्षा अधिक दागिन्यांची चोरी झाली आहे.
चोरटयांनी काही दिवसापूर्वी चोरी झालेल्या सराफाच्या दुकानाशेजारी दुकान भाड्याने घेतले होते. तेथे त्यांना मसाल्याचे दुकान सुरु करायचे होते. त्यांनी दुकानात फर्निचरचे काम सुरू केले होते. काम सुरू असल्याने चोरट्यांचा नागरिकांना संशय आला नाही. शुक्रवारी माऊली सराफ पेढी दुकान बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काम सुरू असल्याचा बहाणा करून दोन दुकानाच्या मध्ये असलेल्या भिंतीला भगदाड पाडले. तेथून आत प्रवेश करून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. दुकानात काम सुरू असल्यामुळे भगदाड पाडत असल्याचा आवाज आला तरी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले . ज्वेलर्सचे मालक दुकान उघडण्यासाठी परत आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दुकान भाड्याने घेणारे कोण आहेत ? त्यांनी ते कधी भाड्याने घेतले ? फर्निचरचे काम कोण करत होते ? नेमकी चोरी कोणी केली अशी माहिती पोलिस घेत आहेत.