जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरात एकाच दिवसात दोन खून झाल्यामुळे खळबळ उडालेली आहे . आधीच्या खुनाप्रमाणेच आजच्या दुसऱ्या खुनातही अनैतिक संबंध कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
शनिवारी शिवाजीनगर हुडको भागात सज्जनगड इमारतीत दुपारच्या सुमारास ३० वर्षीय नरेश आनंदा सोनवणे या युवकाच्या हत्येची घटना घडली. मारेकरी फरार झाला आहे. येथील रहिवाशी महिलेचा पती बाहेरगावी असून या महिलेचे दोन युवकांसोबत प्रेमसंबंध जुळले . त्यापैकी एकाला दुसऱ्याचेही संबंध असल्याचे समजल्यावर वाद विकोपाला जाऊन अनैतिक संबंधातून ही हत्या घडली असल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ठाकूरवाड याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतशरीर शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रवाना करण्यात आले संशयित गुन्हेगाराच्या तपासासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. चॉपरने वार केल्याने हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शनिवारी सकाळीदेखील समतानगर परिसरात अनैतिक संबंधातून युवकाची हत्या झाल्याच्या घटनेने खळबळ उडालेली असताना लगेचच दुसरी हत्येची घटना घडली या दोन्ही हत्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. समतानगरात तरुणाच्या मानेवर वार करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेच्या अवघ्या काही तासात शहरात दुसरा खून झाला आहे.
वाढती गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देणारी ठरते आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून जीवे मारणे शुल्लक ठरावे , एवढी मजल गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची वाढली आहे .