भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील महेश कॉलनी परिसरातील फ्लॅटला पहाटे साडेचारच्या सुमारास लागलेल्या आगीत पित्याचा मृत्यू झाला असून मुलगा होरपळला गेला आहे.
महेश कॉलनीतील निकुंज अपार्टमध्येमध्ये दुसर्या मजल्यावर केशवा वाधवाणी हे कुटुंबासह राहतात. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून आरोळ्या ऐकू आल्या. आगीच्या ज्वाला आणि धुर बाहेर निघू लागला. यामुळे इमारतीमधील रहिवाशांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना वाधवाणी यांच्या घराला आग लागल्याचे दिसून आले. नागरिकांनी तातडीने अग्नीशामन दल आणि बाजारपेठ पोलिसांना पाचारण केले.
फायरब्रिगेडच्या पथकाने केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. या आगीत केशवलाल वाधवाणी (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीर होरपळला आहे. त्याला डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेऊन मदतकार्य केले.
नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. वाधवान कुटुंबात चार जण राहत असून ही आग नेमकी कशी लागली याबाबत माहिती समोर आलेली नाही. बाजारपेठ पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.