जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील खेडी शिवारातील माऊली नगरात कुटुंब झोपले असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोकडसह सोन्याचांदीचे दागिने आणि दोन मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे रविवारी २६ जून रोजी सकाळी ६.३० वाजता उघडकीला आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरीष चंद्रकांत चौधरी (वय-३२) रा. प्रेम बेकरीजवळ, माऊली नगर, खेडी शिवार जळगाव हे आपल्या पत्नी व मुलीसह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील कंपनीत ते नोकरीला आहे. शनिवार २५ जून रोजी त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे ते घरीच होते. रात्री साडेअकरा वाजता कुटुंबियांसह जेवण करून ते घराच्या पुढच्या हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरातील बंद दरवाजा तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केला व कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण, रोकड आणि दोन मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी ६.३० वाजता नेहमीप्रमाणे शिरीष चौधरी हे उठले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शिरीष चौधरी फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.