नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारतामधील करोनाच्या दुसऱ्या लाटेमुले भारताची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून भारताची मदत करण्यासाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत.काही देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गुगलने भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे.

गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे. दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत असल्याबद्दलही पिचाई यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या या मदतीमुळे भारताला मोठी लढाई जिंकण्यासाठी आणखी थोडे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
‘भारतामधील करोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहून धक्का बसला आहे. गुगल आणि गुगलमधील सर्वजण भारताला १३५ कोटींची मदत करणार आहेत. युनिसेफच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, सर्वाधिक धोका असणाऱ्या समाजातील घटकांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोनासंदर्भातील माहिती पोहचवण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे,’ असे पिचाई यांनी स्पष्ट केले आहे.







